Thursday, October 13, 2011

महागाई आणि बेडूक

वेताळ ने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे तो पुन्हा राजा विक्रमादित्याच्या तावडीतून सुटून झाडावर जाऊन बसत असे. पण, धैर्य आणि पराक्रम अंगी असल्यामुळे कंटाळा, आळस झटकून राजा पुन्हा वापस गेला आणि वेताळला घेऊन नगराच्या दिशेने चालू लागला. बरयाच वेळ शांतपणे चालत असताना वेताळने राजाला पुन्हा एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला बेडकांचा आवाज आला. त्यावर वेताळ म्हणाला, ‘‘राजा आज मी तुला एक प्रश्न विचारतो, जो या बेडकांशी संबंधित आहे.'' दोन मित्र होते. जे सतत विज्ञानाचे नवीन प्रयोग करीत असे. बेडकासोबत प्रयोग करीत असताना एका मित्राने बेडकाला उकळत्या पाण्यात टाकले. त्याच सुमारास दुसरा मित्र वेगळा प्रयोग करीत होता. त्याने प्रथम बेडकाला साध्या पाण्यात टाकले. मग त्या पाण्याला त्याने गरम करायला सुरुवात केली. हळूहळू ते पाणी गरम होऊ लागले आणि थोड्याच वेळाने त्या भांड्यातले पाणी उकळू लागले. इतकी गोष्ट सांगून वेताळने राजाला विचारले, ‘‘राजा दोन्ही बेडकं हे उकळत्या पाण्यात आहे. त्यात असलेल्या बेडकांचं काय झालं असेल. मला या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा तुझ्या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील.''

या वेळेस मात्र राजा विचारात पडला. दोन्ही बेडूक एकाच परिस्थितीत आहे. फक्त त्या परिस्थितीपर्यंत ते वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले आहेत. दोन्ही बेडकं मेली असावीत, असा त्याचा विचार झाला. पण, अचानक त्याला inflation (महागाई वाढी चा दर) आणि त्यामुळे त्याच्या होणाऱ्या परिणामांची आठवण झाली आणि तो बोलू लागला.

वेताळ, ह्या प्रयोग मुळे मला महागाई वाढीचा दराने त्रासलेल्या, पण त्याकरिता गुंतवणुकीत कुठलेच बदल न करणारया गुंतवणूकदाराची आठवण आली. खरं तर दोन्ही प्रयोगांमध्ये बेडूक उकळत्या पाण्यात आहे त्यामुळे साहजिकच असं वाटेल की, दोन्ही बेडूक मेले असावेत, पण ते बरोबर नाही. पहिल्या प्रयोगात जेव्हा बेडकाला सामान्य तापमानातून उकळत्या पाण्यात टाकलं त्या वेळेस एकदम झालेला बदल बेडकाच्या लक्षात येईल आणि तो उडी मारून भांड्याच्या बाहेर येईल किवा तसा प्रयत्न सतत करेल आणि कदाचित यशस्वी होऊन जिवंत राहील. दुसऱ्या प्रयोगात मात्र बेडूक शांत आहे. कारण, तो सामान्य तापमानाच्या पाण्यात आहे. त्या वातावरणाची / तापमानाची त्याला सवय झाली असेल. तापमानात अतिशय हळू बदल केल्यामुळे त्यातले बदल त्याच्या लक्षात येणार नाही. ज्या पाण्यात तो आधीपासून आहे त्यात अचनाक मोठा बदल झाला नसल्यामुळे गरम होत असलेलं पाणी हेच सामान्य तापमानाचं पाणी आहे या भ्रमात/विचाराने तो भांड्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करणार नाही. पण, जेव्हा पाणी उकळायला लागेल आणि तापमान असह्य होईल त्या वेळेस मात्र बेडूक निश्चितच मरेल.

Inflation हे एक असंच हळूहळू गरम होणारं पाणी आहे, ज्यात सामान्य जनता/गुंतवणूकदार होरपळले जातात. Inflation हे एक slow poison आहे ज्याचा प्रभाव लगेच जाणवत नाही. आर्थिक क्षेत्रात मोठी घडामोड झाल्यास गुंतवणूकदार त्याचा काय प्रभाव राहील याची ऊहापोह करून बदल करीत असतो. पेट्रोल एकदम महाग झाल्यास कारऐवजी टू-व्हीलर किवा पेट्रोल कारऐवजी डिझेल कारचा वापर, असे काही उपाय करीत असतो. पण या गोष्टी/मोठे बदल वारंवार होत नसतात. पण, दैनंदिन वापराच्या गोष्टींची भाववाढ ही सतत होत असते आणि त्याचा बदल खूप मोठा नसतो, पण जसा जसा काळ वाढत जातो त्याचा प्रभाव जाणवू लागतो.

Particular

Prices 2001-02

Prices 2010-11

% Change

Sugar (1 Kg)

16

40

9.60%

Cooking Oil (5 Ltrs)

290

450

5%

Rice (Per Kg)

14

40

11.07%

Pulses (Per Kg)

20-30

50-80

10.31%

Wheat (Per Kg)

10

25

11.70%

Detergent

23

70

11.70%

Soap (Personal Care)

7

18

9.90%

Petrol (1 Ltr)

34

75

8.23%

सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे दैनंदिन गरजेच्या काही निवडक वस्तूंच्या किमतीत वाढ सरासरी ६-१२ टक्के प्रती वर्ष या दराने झाली आहे. ज्या व्यक्तीचे उत्पन्न यापेक्षा जास्त आहे त्यांना याचा विशेष प्रभाव जाणवणार नाही. पण ज्या व्यक्तींचे पगार/उत्पन्न दरवर्षी यापेक्षा जास्त नाही वाढले किवा जे फक्त गुंतवणूकीवर मिळणारया परताव्यांवर अवलंबून आहे त्यांना महागाईचा चटका निश्चितच जाणवला असेल. गेल्या १० वर्षांत बँक फिक्स डिपॉझिटचे व्याज दर ६-१० टक्के या दरम्यान होते.सरासरी याला ८ टक्के प्रती वर्ष धरू या. गुंतवणुकीवर टॅक्स वगळून मिळणारे परतावे हे Inflation पेक्षा जास्त हवे अन्यथा काही काळाने मूळ रक्कम सुद्धा खर्चाच्या कामी वापरावी लागेल.

सोबत दिलेला तक्ता हा फक्त निवडक वस्तूंशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त अश्या अनेक वस्तू/सेवा आहेत ज्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे आणि त्या वस्तू/सेवांचा उपयोग प्रत्येक व्यक्ती करीत असतो. उदाहरणार्थ शाळेची फी, शिक्षण साहित्याच्या वस्तू, औषधे, वीज, पाणी इत्यादी. यांची भाववाढ निश्चित भरपूर झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक ऐक्छिक गोष्टी आहेत ज्यात आज आपण खर्च करत असतो जो आता आवश्यक झाल्यात जमा आहे सोशल स्टेटस् जपायच्या नादात सुद्धा अनेक अनावश्यक खर्च करावे लागतात जे आधीच भरमसाट वाढलेल्या खर्चाच्या आगीत तेल ओतण्यासारखं आहे. एक गुंतवणूकदार या नात्याने प्रत्येक व्यक्तीने महागाईच्या या हळूहळू प्रमाणात गम होत जाणारया पाण्यापासून सावध व्हावे. आपण केलेली गुंतवणूक ही inflation ला मात देऊ शकते अथवा नाही याचा विचार करणं आवश्यक आहे. सगळ्या स्तरावर बदल होत असताना गुंतवणूकीत सुद्ध बदल आवश्यक आहे. आजपर्यंत आपण स्वत: गुंतवणूक केली. सुरक्षित आणि ठरावीक (सेफ अ‍ॅण्ड स्टेबल) परतावे देणारया गुंतवणूकीकडे आपला कल होता पण बदलेल्या परिस्थितीचे नीट आकलन होण्याच्या दृष्टीने योग्य सल्लागाराची निवड करून त्याचा साहाय्याने प्लॅनिग करणे आवश्यक आहे जेणेकरून महागाईच्या चटक्याचा प्रभाव जाणवणार नाही. राजाच्या या बोलण्यावर वेताळ हसला आणि म्हणाला, ‘‘राजा तुझ्या या अतिशय प्रासंगिक आणि सडेतोड उत्तराने मी प्रसन्न झालो. पण, तू मात्र बोललास त्यामुळे महागाईचे नाही, तर मला पुन्हा वापस आणायचे कष्ट करावे लागतील. मी चाललो.

नोट: वर सांगितलेल्या प्रयोगाला Boiling Frog Syndrome असेही म्हणतात. काही वैज्ञानिकांच्या मते दुसऱ्या प्रयोगातील बेडूक सुद्धा बाहेर उडी मारेल आणि वाचेल. पण, छोटे बदल अपेक्षित असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बदल न केल्या ने मोठं नुकसान होऊ शकतं याकरिता सहसा हे उदाहरण देण्यात येतं.