२१ मोदकांचा प्रसाद
नुकतेच गणरायाचे विसर्जन झालेले आहे. एक गुंतवणुकदार या नात्याने आपण काय करू शकतो आणि काय करायला नको, याचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरेल. तर या मंगल समयी विघ्नहर्त्याचे स्मरण करून गुंतवणुकीत भरपूर यश मिळेल, अशी प्रार्थना करू आणि प्रसादाचे २१ मोदकरूपी नियम ग्रहण करू.
१) प्रथम तुला वंदीतो... सर जॉन टेम्पलटन यांनी गुंतवणुकीचे अतिशेय सोपे असे काही नियम सांगितले आहेत, त्यानुसार देवाला स्मरून गुंतवणुकीची सुरवात केल्यास गुंतवणुकदार चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो आणि त्यात चुकण्याची संभावना कमी होते.
२) होमवर्क व्यवस्थित करा आणि तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणूक करायच्या आधी त्या करिता लागणारं होमवर्क आणि प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यात गुंतवणूक सल्लागार किंवा फायनांशियल प्लानर यांचा सल्ला मोलाचा ठरेल. ज्याप्रमाणे औषधांची अनेक दुकानं असून सुद्धा आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्याचप्रमाणे फायनांशियल प्लानरच्या मदतीने योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास यश निश्चितच मिळेल.
३) ज्याप्रमाणे डॉक्टरांच क्वालिफिकेशन किंवा अनुभव रोग निदानाकरिता महत्त्वाच ठरतं, त्याचप्रमाणे तुम्ही निवड केलेल्या फायनांशियल प्लानरची विश्वासहार्तता, अनुभव हे महत्त्वाचं आहे. अत्यंत कष्टाने कमावलेल्या आपल्या पैश्यांची जबाबदारी आपलीच आहे, त्यामुळे ते योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच गुंतवायला हवे.
४) खर्च कमी करा : सोपा आणि छोटा नियम पण अवलंबन करायला अतिशय कठीण. पण थोडा विचार करा- ५०००/- महिना खर्च कमी करणं सोप आहे अथवा ५,०००/- महिना उत्पन्न वाढवण? समजा रेट ऑफ रिटर्नस १० टक्के असल्यास किमान ६ लाखांची गुंतवणूक हवी जेणे करून त्यावर ५,०००/- मासिक उत्पन्न मिळेल. खर्चावर ताबा मिळवल्यास साहजिकच उत्पन्नात वाढ झाल्यासारखे फायदे मिळतील.
५) Start early, Save regularly - लवकर आणि नियमित गुंतवणूक केल्यास मार्केटच्या चढउतारीचा फायदा घेता येतो. ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे कासवासारखी चिकाटी असणे कधीही फायद्याचे राहील.
६) आरोग्य विमा - आजच्या या आधुनिक युगात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. त्यामुळे एका सामान्य भारतीय व्यक्तींच आयुष्यमान वाढलं आहे. पण त्यासोबतच अनेक रोग आजार मागे लागले आहे. योग्य आरोग्य विमा नसल्यास आणि खर्च भरमसाठ वाढल्यामुळे अनेक गुंतवणुका हॉस्पिटल बिल फेडण्याच्या कामी येतात. उपचाराकरिता गुंतवणूक बंद करायची दुर्दैवी स्थिती येऊ नये, याकरिता आरोग्य विमा हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.
७) जीवन विमा - इन्श्यूरन्स हा एक खर्च आहे. त्यामुळे त्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने पैसे लावू नये. ज्याप्रमाणे आपण गाडीचं इन्श्युरन्स करतो, त्याचप्रमाणे लाईफ इन्श्यूरन्स विकत घ्यावा. कमीत कमी खर्चामध्ये (अर्थात प्रिमीयम) जास्तीत जास्त लाभ (विमा रक्कम) कसा घेता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. त्याकरिता टर्मप्लान/रिस्क इन्श्यूरन्स हे सर्वात महत्त्वाचं ठरतं.
८) इन्फ्लेशन : इन्फ्लेशन किंवा महागाई वाढीचा दर हा सर्वात मोठा टॅक्स आहे. पण बहुतांश वेळा त्याचा प्रभाव गुंतवणुकदाराच्या लक्षात येत नाही. टॅक्स दिल्यानंतर मिळालेले परतावे हे गुंतवणुकदाराचे खरे परतावे आहे. ज्याप्रमाणे गुतंवणुकीत चक्रवाढ पद्धती लागू होते, त्याचप्रमाणे महागाई वाढीच्या दरात पण दरवर्षी वाढ होत आहे. प्रत्येक गुंतवणुकीतले परतावे इन्फ्लेशनला मात देऊ शकत नाही. पण पोर्टफोलियोमधे अशा गुंतवणुकी जरूर असायला हव्या. ज्यात परतावे इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहे.
९) गुंतवणुकदार बना, ट्रेडर नव्हे - योग्य विचार करून, व्यवस्थित अभ्यास करून आणि लॉंग टर्मकरिता गुंतवणूक करा. नेहमी लक्षात असू द्या Rule of Compounding च्या नियमा प़माणे जास्त कालावधी करिता केलेल्या गुंतवणुकीत फायदा जास्त होतो. शेअर्स किंवा म्युचल फंडमध्ये नेहमी फेरफार/ट्रेडिंग केल्यास फक्त शेअर ब्रोकर किंवा म्युचलफंड एजेंटचा फायदा होईल, तुमचा नाही.
१०) भेडचाल नको - प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती, त्याची रिस्क घेण्याची क्षमता आणि अपेक्षित फायनांशियल गोल वेगळे असतात. त्यामुळे सगळे मित्र/नातेवाईक एका पद्धतीने/एका प्रकारात गुंतवणुक करतात म्हणून मी पण तिथेच गुंतवणुक करीन हा विचार बरोबर नव्हे. स्वत:ला योग्य राहील आणि व्यवस्थित परतावे अनावश्यक रिस्क न घेता मिळतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे.
११) देशाची अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकचे धोरण, जगातील देशामध्ये होणारे आर्थिक बदल, फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनालिसीस यापेक्षा महत्त्वाचं आहे गुंतवणुकदाराची स्वत:ची आर्थिक परिस्थितीची जाणीव. स्वत:ची रिस्क घ्यायची इच्छाशक्ती आणि स्वत:चे फायनांशियल गोल. जर गुंतवणुकदाराने या गोष्टींची काळजी घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा गुंतवणुकीला निश्चितच योग्य दिशा मिळेल.
१२) डायवर्सिफीकेशन - सगळ्या गुंतवणुकी एकाच प्रकारच्या एसेट क्लासमध्ये केल्यास रिस्क वाढते. त्यामुळे गुंतवणुकदाराने वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूक करावी, जेणेकरून पोर्टफोलियोची रिस्क तर कमी होईलच, सोबतच परतावे बरेच स्थिर होतील. निश्चित परतावे देणारे प्रॉडक्टस अर्थात डेट इन्व्हेस्टमेंट तसेच शेअर्स इत्यादिचा सहभाग असलेल्या पोर्टफोलियोमध्ये गुंतवणुकदाराला चांगला परतावा कमी रिस्क घेऊन मिळू शकतो.
१३) पारदर्शिता - गुंतवणूक केल्यास कमी जास्त परतावे हे त्याचा अविभाज्य भाग आहेच. पण हे परतावे कसे येतात, हे माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही गुंतवणूक परिपूर्ण नसते. एखाद्या गुंतवणुकीत परतावे कमी तर कुठे लिक्वीडिटी नाही तर कुठे त्यावर टॅक्स जास्त बसतो. पण नेहमी लक्षात असू द्या, गुंतवणुकीचे परतावे कसे येतात आणि जोवर त्याचे लॉजिलक उत्तर मिळत नाही, तोवर त्यात गुंतवणूक करू नये.
१४) आयकर सवलती - टॅक्स वाचतो किंवा एखाद्या गुंतवणूक प्रकारात आयकरात सूट मिळते फक्त या एकमेव कारणाकरिता गुंतवणूक करणे बरोबर नव्हे. त्यातले परतावे हे महत्त्वाचे आहेतच आणि ते गुंतवणुकदाराच्या फायनांशियल गोलला अनुसरून असायला हवे.
१५) मोठ्या चुका टाळा - लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादात किंवा जास्त परताव्यांचा लोभापायी गुंतवणूक करू नये. सामान्य परतावे जास्त कालावधी करिता असणे हे कधीही फायद्याचे आहे. पण भरपूर परतावे आहे म्हणून गुंतवणूक करून मूळ रक्कमच धोक्यात घालायची हे बरोबर नव्हे. त्यामुळे जास्त परतावे तेही गॅरंटी सोबत ही धोक्याची घंटा समजावी.
१६) टी.व्ही. हे माध्यम मनोरंजनाकरिता तयार झालं आहे, त्यात माहिती, बातम्या, विश्लेषण या गोष्टी नंतर आल्या. फायनांशियल न्यूज चॅनल मधील सर्व माहिती बरोबरच आहे किंवा त्याचा हेतू गुंतवणुकदारांच्या फायद्याचाच आहे, हे जरूरी नव्हे. श्री गणरायाप्रमाणे ते सगळं ऐकून खरचं आपल्या हिताचा आहे का, याचं विश्लेष करून मगच त्यावर कृती करावी.
१७) घाबरू नका - प्रत्येक गुंतवणुकीचे काही फायदे आणि तोटे असतात. कुठलीच गुंतवणूक परिपूर्ण नव्हे. त्यामुळे एखाद्या गुंतवणुकीत तोटा झाल्यास त्याला वर्ज्य मानू नका. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, आपण काय चूक केली या बद्दल आपल्या प्लानर सोबत विचार विनिमय करा. घाबरून त्या गुंतवणुकीला वर्ज्य केल्यास त्यातले फायदे पण हातातून जातील.
१८) लोन घेऊन कधीही गुंतवणूक करू नये. बर्याच वेळेस असं बघण्यात येत की लोनवरच व्याज दर ९-१० टक्के आहे, पण शेअर्स/हेरिव्हेटीटजमध्ये तेजी असताना त्यात १५-२० टक्के मिऴतात आहेत. परतावे कमी-जास्त होतील, पण व्याज भरणं हे नेहमी जरुरी राहील. त्यामुळे कितीही आकर्षक वाटत असेल तरी लोन घेऊन गुंतवणूक करू नये.
१९) इक्विटी लॉंग टर्म, डेट शॉर्ट टर्म - प्रत्येक व्यक्तीचे काही फायनांशियल गोल्स हे लॉंग टर्म असतात तर काही कमी कालावधीचे असतात. सामान्यत: जेव्हा कालावधी लांब आहे, त्याकरिता गुंतवणुकीत जास्त रिस्क घेतल्या जाऊ शकते. अशा वेळेस शेअर्स/स्टॉक्स इत्यादी गुंतवणूक फायद्याची ठरेल. पण कालावधी कमी असल्यास बॉन्डस्, फिक्स डिपॉझिट इत्यादी ठिकाणी गुंतवणूक करावी.
२०) COMPOUNDING - नेहमी लक्षात असू द्या, हे जगातलं आठवं आश्चर्य आहे. याचा पुरेपूर फायदा घेऊन गुंतवणुकदाराने आपल्या फायनांशियल गोलकडे वाटचाल करावी. Best comes at last या नियमाप्रमाणे लांब कालावधीकरिता गुंतवणूक करावी.
२१) वर्षातून किमान एकदा तरी आपल्या सगळ्या गुंतवणुकी, इन्श्युरन्स इत्यादीचे मूल्यांकन आणि ते योग्य ठिकाणी आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थितीत बदल होतच असतो. त्यामुळे गुंतवणुकीत बदल करण्याची आवश्यकता असल्यास आपल्या फायनांशियल प्लानर सोबत बसून, त्याचे नियोजन वर्षातून एकदा तरी करायलाच हवे.
No comments:
Post a Comment